मिरज : बंगळुरू ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ग्रीन सिग्नल दिला असून, लवकरच ही रेल्वे रुळावर धावणार आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे अवघ्या 17 तासात बंगळुरूहून मुंबईला पोहोचणार आहे. यामुळे कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या बेळगाव ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे या दोनच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. या भागातून स्लीपर वंदे भारत सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस ही रेल्वे चालवण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी ही रेल्वे नियमित स्वरूपात सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून होत असलेला पाठपुरावा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने अखेर या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
हुबळी, मिरज, पुणे मार्गे धावणार
ही स्लीपर वंदे भारत हुबळी, बेळगाव, मिरज आणि पुणे या मार्गे धावणार आहे. यामुळे मिरज रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल. या रेल्वेला केवळ महत्त्वाच्या स्थानकांवरच थांबा देण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होऊन सुपरफास्ट प्रवासाचा आनंद मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी दिली.
कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ बारगळली?
कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत सुरू करण्याची मागणी खासदार, रेल्वे सल्लागार समिती सदस्य आणि प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. कोल्हापूर आणि मिरज स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वेने अद्याप या प्रस्तावाला परवानगी दिलेली नाही. या विषयावरील चर्चा थंडावल्याने ही रेल्वे बारगळली की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाला प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.