सांगली : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता चार महिन्यांपासून कायम आहे. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात नवा विक्रम झाला. एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल 15 हजार 656, तर सोन्याच्या दरात 1 हजार 545 रुपयांनी वाढ झाली.
बुधवारी सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम जीएसटीसह 1 लाख 46 हजार 981 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 88 हजार 915 रुपयावर पोहोचला. चांदीची वाटचाल आता तीन लाख रुपयांकडे होत असल्याचे सराफांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात चांदीचा दर तब्बल 70 हजार रुपयांनी, तर सोन्याचा दर पाच हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांचा प्रतिसाद थंडावला आहे. आगामी काळात सोन्या-चांदीच्या दराबाबत काही सांगणे शक्य नसल्याची माहिती सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव सावकार शिराळे यांनी सांगीतले.