सांगली : चांदीची चमचम दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. सोन्याच्या 11 डिसेंबर रोजी 800 रुपयांनी वाढ झाली, तर चांदीदरात एका दिवसात 2000 रुपयांनी वाढ झाली. 1 लाख 95 हजार 185 रुपये जीएसटीसह दर आहे. चांदीदरात रोजचा बदल हजाराच्या घरात आहे. चांदीची पावले बघता बघता दोन लाखांकडे वळली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या गुंतवणुकीच्या उलाढाली वाढल्या असल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर चांदीचा दर जात आहे. सामान्य ग्राहकांपेक्षाही मोठे गुंतवणूकदार चांदीची अधिक मागणी करत आहेत.
सामान्य ग्राहक चांदीच्या वस्तू, भांडी, दागिने, देव-देवतांच्या मूर्तींमध्ये गुंतवणूक करतो. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने देवाची भांडी, पूजेचे साहित्य चांदीचे खरेदी केले जाते. लग्नसराईमुळे चांदीचे दागिने, भांडी, देवतांच्या मूर्तींची खरेदीही सुरू आहे. लग्नसराईत चांदीच्या वस्तूंची मागणी दुप्पट होते. मात्र यंदा चांदीचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्राहक मोजकीच खरेदी करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या दरात खूपच तेजी आहे. सांगली सराफ पेठेत ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे. एका आठवड्यात झपाट्याने चांदीचा दर वाढला. त्यामानाने सोन्याचा दर फारसा वाढला नाही. दर आणखी चढाच राहील, असा अंदाज सराफांनी वर्तवला आहे. औद्योगिक क्षेत्रात विशेषत: इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांकडून चोख चांदीचा उठाव अधिक केला जात आहे. त्यामुळे यापुढेही मागणी आणि दर चढतच राहण्याची शक्यता सराफ पेठेतून वर्तवण्यात आली.
एका आठवड्यात 25 हजारांनी वाढ
मागच्या आठवड्यात 1 लाख 70 हजारांपुढे असलेला चांदीदर या आठवड्यात 1 लाख 95 हजारांपुढे गेला.
जागतिक पातळीवर सर्वच स्तरातून सोने-चांदीतील गुंतवणूक वाढली. त्यामुळे मागणी अचानक वाढल्याने तुटवडा वाढला.
इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरी, सोलर पॅनल आणि मोबाईल पॅनलमध्ये चांदीचा वापर होतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील चांदीची मागणी दिवसागणिक वेगाने वाढत आहे.
चीन, बँकाक, रशिया असे अनेक देश चांदीची खरेदी वेगाने आणि जोमाने करत आहेत.
आखाती देश आणि विशेषत: दुबईतील मोठे सराफ चांदीची खरेदी व्यापक प्रमाणात करत असल्याने दरवाढीचा आलेख खाली आलाच नाही.
सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने आपल्याकडे चांदीच्या वस्तू खरेदी करण्याला पसंती आहे. त्याचवेळी चीन आणि आखाती देशांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून चांदीची गुंतवणूक वाढवली आहे. त्यात भर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या कंपन्याही चांदीची उचल करत आहेत. त्यामुळे दराची वाटचाल दोन लाखांच्याही पुढे जाण्याची चिन्हे आहेत.- सावकार शिराळे, सचिव सांगली जिल्हा सराफ समिती सांगली.