कुंडल : येथील प्राचीन जैन मूर्तीची विटंबना करणार्‍या समाजकंटकांना तत्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन आमदार अरुण लाड, किरण लाड यांच्यासह जैन समाजबांधवांनी प्रशासनास दिले. 
सांगली

सांगली : कुंडलमध्ये जैन समाजाचा मूकमोर्चा

मूर्ती विटंबना करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करा; तहसीलदार, पोलिसांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

कुंडल : प्राचीन जैन मूर्तीची विटंबना करणार्‍या समाजकंटकांना तत्काळ अटक करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा सकल जैन समाज यांच्यावतीने तहसीलदार व कुंडल पोलिस यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे देण्यात आला. समाजाच्यावतीने यावेळी गावातून मूकमोर्चा काढण्यात आला.

यावेळी आमदार अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, कुंडलिक एडके, दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण जैन भारत सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, दक्षिण जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, पलूसचे उद्योजक बी. आर. पाटील, राजू मदवाने, वसंत राजमाने उपस्थित होते. यावेळी जैन समाजातील मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने चालणारा आहे. परंतु अशा या समाजाच्या भावना कोणी दुखावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल. कुंडल येथील हे तीर्थक्षेत्र अतिशय सिद्धक्षेत्र आहे. आजपर्यंत या तीर्थक्षेत्रावर कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत. या कुंडल गावातील इतर समाजही सिद्धक्षेत्राला ग्रामदैवत मानत आहे. यांच्याकडून नेहमीच प्रत्येक धार्मिक कार्यात पाठिंबा असतो. परंतु अलीकडच्या एक-दोन वर्षांत या सिद्ध अतिशय क्षेत्रावर काही बाहेरील मंडळी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आता हे थांबवावे अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. या प्राचीन मूर्तींची विटंबना करणार्‍या समाजकंटकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवला जाईल.

याप्रसंगी किरण लाड म्हणाले, आजपर्यंत या गावात अशा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार्‍या घटना घडल्या नव्हत्या. मात्र या दोन-तीन वर्षात या क्षेत्रावर वातावरण गढूळ करण्याच्या उद्देशाने काही घटना घडत आहेत. कुंडल हे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचारांचे गाव आहे. जो वातावरण बिघडवण्याचे काम करेल, त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल.

प्रारंभी गावातील प्रमुख मार्गांवरून मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कुंडल, बुर्ली, वाळवा, आष्टा, दुधोंडी, तुपारी, रामानंदनगर, पलूस, भिलवडी, अकलूज, जयसिंगपूर, सांगली, नातेपुते, वडूज यांसह अनेक ठिकाणावरून जैन श्रावक-श्राविका, वीर सेवा दल, तसेच कुंडलचे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण लाड, अ‍ॅड. दीपक लाड, सिमंधर गांधी, वैभव शहा, शीतल शहा, राजकुमार चौगुले, दीपक वर्णे, सचिन लडगे, प्रफुल पाटील, सचिन कत्ते, साईदास लाकुळे, नितीन कोल्हापुरे, विजय राजमाने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT