तासगाव : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे येण्या-जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर शेकोटी का पेटविली, असे विचारल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात रमेश सोपान चव्हाण (वय ४९, रा. सिद्धेवाडी) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात जखमी रमेश चव्हाण यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक उमेश चव्हाण, नवनाथ चव्हाण, प्रशांत चव्हाण आणि अभिजित अशोक चव्हाण (सर्व रा. सिद्धेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेवाडी येथील 'शेरीचा मळा' परिसरात फिर्यादी रमेश चव्हाण यांचा मळा आहे. या मळ्याच्या वाटेवर संशयित प्रतीक, नवनाथ, प्रशांत आणि अभिजित शेकोटी पेटवून बसले होते. त्यावेळी रमेश यांनी, ‘मळ्यातील येण्या-जाण्याच्या मुख्य रस्त्यावर अशी गर्दी करून शेकोटी का पेटवली आहे?’ असे विचारले. या रागातून संशयित नवनाथ, प्रशांत आणि अभिजित यांनी संगनमत करून रमेश यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. संशयित प्रतीक चव्हाण याने धारदार कोयत्याने रमेश यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर जखमी रमेश यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करताना संशयितांनी रमेश यांना ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास तासगाव पोलिस करत आहेत.