सांगली ः आईचे छत्र हरपलेल्या सात वर्षांच्या बालिकेला 27 वर्षांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बालगृहात सोडले. अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तिचे कोल्हापूर येथील महिलागृहात पुनर्वसन झाले. पुढे विवाहानंतर तिला दोन मुले झाली. आपला एक भाऊ होता, हे तिला धूसरसे आठवत होते. त्या आठवणीच्या आधारावर तिने भावाचा शोध सुरू केला आणि तब्बल 27 वर्षांनंतर तिला तिचा भाऊ भेटला. या अविश्वसनीय भेटीसाठी चाईल्डलाईन आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांनी मोलाची मदत केली.
मातेच्या निधनानंतर 1998 मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी एका बालिकेला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालगृहात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी ती बालिका केवळ सात वर्षांची होती.
अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बालिकेला पुढील पुनर्वसनासाठी कोल्हापूर येथील तेजस्विनी महिलागृहात स्थलांतरित करण्यात आले. तिला आपला एक भाऊ असल्याची अस्पष्ट आठवण होती. पण तो कुठे आहे याची माहिती नव्हती. दुसरीकडे, भावालाही आपली एक बहीण होती, हे आठवत होते. दोघेही 27 वर्षे एकमेकांना शोधत होते, पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती.
बालगृहात बालिकेच्या आईच्या मृत्यू प्रमाणपत्राविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. बालकल्याण समितीच्या सदस्या आयेशा दानवाडे यांनी परिस्थितीची माहिती घेतली. बालिकेच्या कागदपत्रांवर तिला दाखल करणार्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता नमूद होता. हा पत्ता सांगलीमधील एका देवदासी महिलेचा होता. दानवाडे यांनी दूरध्वनीद्वारे सांगलीत या भागात कार्यरत असलेले संग्राम संस्थेचे कार्यकर्ते किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधला. तपासात असे समजले की, 1998 मध्ये बालिकेच्या आईचे निधन झाले. बालिकेला एक भाऊही असल्याची माहिती मिळाली.
संग्राम संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता मनोजी माया यांनी तिच्या भावाचा शोध घेतला. बालकल्याण समितीच्या आयेशा दानवाडे यांनी या बहिणीला तिच्या भावाचा शोध लागल्याचे आणि तो सांगलीमध्ये राहत असल्याचे सांगितले, तेव्हा बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती अनेक वर्षांपासून आपल्या भावाला शोधत होती. 14 वर्षांपूर्वी संस्थेमार्फत तिचे कराड येथे लग्न झाले असून, ती आता दोन मुलांची आई आहे.
बालकल्याण समितीच्या सदस्या आयेशा दानवाडे आणि चाईल्डलाईनचे प्रतिनिधी इम्तियाज हकीम यांनी संग्रामच्या सामाजिक कार्यकर्त्यांना, भावाला बालकल्याण समितीमध्ये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, सामाजिक कार्यकर्ते विवाहित भाऊ आणि त्याच्या पत्नीला घेऊन बालकल्याण समितीमध्ये दाखल झाले. सध्या भाऊ 41 वर्षांचा असून तो गवंडीकाम करतो.
सांगलीच्या बालकल्याण समिती सदस्या आयेशा दानवाडे आणि चाईल्डलाईनचे प्रतिनिधी इम्तियाज हकीम यांनी संग्राम संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने, 27 वर्षांपूर्वी आईचे छत्र हरपलेल्या या अनाथ बहीण-भावाची भेट घडवून आणली. बहिणीला तिचे कुटुंब आणि माहेर भेटले. तिने भावाच्या घरी जाऊन आपल्या आईबद्दल माहिती घेतली. घराची पाहणी केली. या हृदयस्पर्शी भेटीमुळे दोघांच्याही चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.