प्रशांत भंडारे
आटपाडी : आटपाडी आणि खानापूर तालुक्यांच्या सीमेवर महादेव टेकड्यांच्या कुशीत वसलेले शुकाचार्य देवस्थान म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि पौराणिक आख्यायिकांचा सुंदर संगम. दुष्काळी पट्ट्याची ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात शुकाचारी परिसर मात्र हिरवाईने नटलेले एक वेगळेच विश्व आहे. डोंगररांगा, कातळकडे, गर्द वनराई, झुळझुळणारे पाणी आणि सभोवतालची गूढ शांतता मनाला क्षणात भुरळ घालते. या परिसराची ओळख धार्मिक स्थळाबरोबरच निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणूनही निर्माण झाली आहे.
शुकाचारीचे धार्मिक महत्त्व त्याच्या पौराणिक कथांमध्ये दडले आहे. महाभारतकार व्यासमुनींचे पुत्र शुकमुनी यांनी येथे तपश्चर्या केली आणि समाधी घेतली, अशी श्रद्धा आहे. शुकमुनींच्या तपश्चर्येशी जोडलेल्या अनेक आख्यायिका आजही स्थानिकांच्या स्मरणात आहेत. डोंगराच्या पोटातील गुहा, समाधीस्थळ आणि त्याभोवतीचे गूढ वातावरण या आख्यायिकांना रोमांचक बनवते. एका प्रचलित कथेनुसार, ब्रह्मचारी शुकमुनी गुहेतील दगडात लुप्त झाले, अशी श्रद्धा आहे.
मात्र शुकाचारीचे वैशिष्ट्य केवळ पुराणकथांपुरते मर्यादित नाही. साधारण ५०० एकर परिसरात पसरलेल्या या डोंगरभागात विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आणि पशु-पक्ष्यांचा वावर आढळतो. पावसाळ्यात डोंगर हिरवाईची शाल पांघरतो. कातळातून झिरपणारे पाणी, छोट्या-छोट्या जलधारा आणि पावसाळी धबधबे परिसराला अधिकच मोहक बनवतात. दुष्काळी भागात हिरवाईचे हे बेट म्हणूनच शुकाचारीकडे पाहिले जाते. येथील जलस्रोत उन्हाळ्यातही टिकून राहतो, ही या परिसराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
श्रावण आला की शुकाचारीचे रूप जणू पालटते. डोंगरांवर पसरलेली हिरवाई, ढगांची सावली, थंड वाऱ्याच्या झुळका आणि मंदिरात घुमणारा हर हर महादेवऽऽचा जयघोष यामुळे परिसर भक्तिमय होतो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी होते. शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. महाशिवरात्रीलाही येथे मोठा धार्मिक उत्सव होतो.
शुकाचारीकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आटपाडी–गोमेवाडी–हिवतड मार्गाने तसेच बाणूरगडच्या बाजूने येथे पोहोचता येते. भिवघाट परिसरातूनही शुकाचारीकडे जाण्यास मार्ग उपलब्ध आहे. जवळच असलेला बाणूरगड हा ऐतिहासिक वारसाही या पर्यटनाला वेगळी जोड देतो. निसर्गाची हिरवी सावली, पुराणकथांचे गूढ आणि भक्तीची प्रसन्नता या तिन्हींचा अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल, तर शुकाचारीची वाट नक्की धरावी. येथे डोंगर केवळ उंच उभे नाहीत; त्यांच्या शांत कुशीत शतकानुशतके जपलेली एक कथा आजही वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत कानावर येते.