कडेगाव शहर : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी केली आहे.
कदम म्हणाले, आजअखेर सभासद शेतकऱ्यांनी सोनहिरा कारखान्यावर दाखवलेला विश्वास आणि कारखान्याची शेतकरी व सभासदांविषयी असलेली बांधिलकी यातूनच हे यश साध्य झाले आहे. कारखान्याने कायमच राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम आणि संचालक तथा आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य शेतकरी व सभासदांना डोळ्यासमोर ठेवून कामकाज केले आहे. कारखान्याने सभासदांना 'व्हीएसआय' मार्फत तयार केलेले वेगवेगळ्या जातींचे उत्तम बियाणे व टिशू कल्चर रोपे माफक दरात उपलब्ध करून दिली आहेत.
तसेच, प्रत्येक वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 'डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण पुरस्कार' व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त १६.३३ टक्के बोनस जाहीर करण्यात आला असून सभासदांना माफक दरामध्ये साखर वाटप करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बिलामधून कपात केलेली सिंचन योजनांची पाणीपट्टी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. सभासद शेतकऱ्यांनी कायमच आपल्या कारखान्यावर विश्वास दाखवला असून, दरवर्षीप्रमाणे चालू वर्षीही कारखान्याने उत्तम तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे परिसरातील सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस गळीतास आपल्याच सोनहिरा कारखान्यास पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक डॉ. शांताराम कदम, सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक सुहास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.