ईश्वरपूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे 13 ते 17 मार्चदरम्यान होणाऱ्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या स्टॉल उभारणीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. दै. ‘पुढारी’ आणि प्रतिराज युवा शक्ती यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव नागरिकांसाठी खरेदी, खाद्य, मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
या फेस्टिव्हलसाठी महिला व बालकल्याण समिती, उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद व तनिष्का फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य हे सहयोगी प्रायोजक आहेत. फेस्टिव्हलच्या स्टॉल उभारणीला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, प्रतिराज युथ फौंडेशनचे संस्थापक व उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या अरुणादेवी पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुप्रिया पाटील,
दै. ‘पुढारी’चे कार्यालय प्रमुख अशोक शिंदे, सीनियर एक्झिक्युटिव्ह मधू देसावळे, विजय देसाई यांच्याहस्ते स्टॉल उभारणीला सुरुवात झाली. या फेस्टिव्हलमध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज, आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणार आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दालन असेल; ज्यामध्ये ग्राहकांना वाहनांची माहिती, टेस्ट ड्राइव्हची संधी आणि स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट मिळणार आहे. खाद्य पदार्थांचेही भरपूर स्टॉल आहेत.