Sangli Khanapur Shivaji University sub centre
विटा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्यासाठी लागेल ती मदत करू, अशी ग्वाही विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि सिनेट सदस्य वैभव पाटील यांनी दिली. आज (दि.२४) विद्यापीठाच्या समितीने खानापुरातील नियोजित उपकेंद्र परिसरातील जागा तसेच शहरातील उपलब्ध इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाटील बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कामकाज सुरू करण्याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतिमान होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी विद्यापीठाच्या समितीने खानापुरातील नियोजित उपकेंद्र परिसरातील जागा तसेच शहरातील उपलब्ध इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली.
या समितीत अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील, समिती सदस्य वैभव पाटील, प्राचार्या डॉ.मेघा गुळवणी, प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परूळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. निवासराव वरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खानापूर शहरातील ज्या चार ठिकाणच्या जागे संबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध इमारतीं ची पाहणी केली. त्यात खानापुरातील संपतराव माने महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था संचलित ज्युनिअर कॉलेज, शोभादेवी पवार ज्युनिअर कॉलेज आणि अपेक्स पब्लिक स्कूल खानापूर या ठिकाणांचा समावेश आहे. या समितीने या चारही ठिकाणी असलेल्या इमारती आणि त्यामधील उपलब्ध सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी या भेटीचा स्थळ अहवाल ही समिती उद्याच म्हणजे २५ जुलैरोजी विद्यापीठात सादर करणार आहे. त्यातून विद्यार्थी, पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर असलेल्या ठिकाणची निवड करून चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच अगदी या जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात निश्चितच सुरू होईल, असे समितीने सांगितल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली.
आपण स्वतः देखील या समिती सदस्यांना खानापूर येथे चालू शैक्षणिक वर्षात उपकेंद्र सुरू होण्यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, असे सांगून दुष्काळी भागात शिक्षणाचे माहेरघर बनवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असा शब्द समितीला दिल्याचेही वैभव पाटील यांनी सांगितले.