आष्टा : येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक वीरशैव सदाशिव कुदळे यांना अज्ञात सायबर भामट्याने तब्बल 2 लाख 67 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. केवळ 897 रुपयांच्या व्यवहाराच्या बहाण्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून लंपास करण्यात आली.
मंगळवारी रात्री वीर कुदळे यांच्या मोबाईलवर एक अज्ञात लिंक आली. लिंक उघडल्यानंतर त्यामध्ये काही वैयक्तिक माहिती भरण्याच्या सूचना दिसून आल्या. त्यानंतर गुगल पे द्वारे 897 रुपये भरण्यास सांगण्यात आले. कुदळे यांनी रक्कम भरताच काही सेकंदातच मोबाईल हॅक झाला. व्यवहारानंतर काही क्षणातच त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून 2 लाख 67 हजार रुपये वजा झाल्याचे मेसेज आले.
अज्ञात खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे समोर आले. हॅकर्सनी कुदळे यांच्या मोबाईलमधील सर्व संपर्क क्रमांक डिलिट केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुदळे यांना मोठा धक्का बसला. बुधवारी सकाळी कुदळे यांनी बँकेत जाऊन खात्याची पडताळणी केली. त्यानंतर सायबर क्राईम विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.