सांगली, मिरजेत शिवजयंती उत्साहात 
सांगली

सांगली, मिरजेत शिवजयंती उत्साहात

हिंदू एकताच्यावतीने मर्दानी खेळ; पाच दिवस विविध कार्यक्रम; प्रतिमेची प्रतिष्ठापना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहर परिसरात विविध पक्ष, संघटनांच्यावतीने शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ठिकठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने आगामी पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने राजवाडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त लाठीकाठी, तलवारबाजीबरोबरच मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मातोश्री महिला भाजी विक्रेता संघ यांच्यावतीने रिसाला रोड भाजी मंडई येथे शिवोत्सव -2025 ला प्रारंभ करण्यात आला. संभाजी भिडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात करण्यात आली. यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे, गजानन मोरे, निखिल सावंत, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, राहुल माने, कल्पना जाधव, सुनित भोसले, मंजुळा कुंभार, शोभा शिंदे, वैशाली बिराजदार, राणी चौधरी, द्राक्षायनी बेळुंबी, विष्णू शिंदे, अनिल बंडगर, शाहीर दगडू जंगम उपस्थित होते.

येथील शिवसेना (ठाकरे गट) सांगली शहरच्यावतीने कॉलेज कॉर्नर येथे शिवजयंतीला उत्साहात प्रारंभ झाला. शहरप्रमुख अनिल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार दि. 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हलगी-कैताळ वादनाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसाद रिसवडे, ओंकार देशपांडे, गजानन खरात, प्रथमेश शेटे, योगेश कुलकर्णी, उत्तम म्हारगुडे, राहुल हातगिणे, अतुल पाटील उपस्थित होते. स्टेशन चौकातही मंडळाकडून शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राजवाडा चौकात हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुपवाड येथील रक्षक ग्रुपतर्फे लाठीकाठी, तलवारबाजी याबरोबरच मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, पंडितराव बोराडे, पृथ्वीराज पवार, संजय जाधव, राजू जाधव, प्रकाश बिरजे, गजानन मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.

मिरजेत विविध कार्यक्रम...

मिरज : शहरासह ग्रामीण भागामध्ये मंगळवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंतीमुळे मिरज शहर शिवमय बनले होते.येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी 108 महिलांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला. मंडळाचे अध्यक्ष सुधीर अवसरे यांनी संयोजन केले. शहरातील मुख्य चौक आणि मंडळांनी शिवजयंतीनिमित्त भगवे ध्वज, भगव्या पताका लावल्या होत्या. संघटित हिंदू संघटनेच्यावतीने महाराणा प्रताप चौकात, हिंदू एकताच्यावतीने हिंदमाता चौकात, रेल्वे प्रवासी सेनेच्यावतीने मिरज रेल्वे स्थानकासमोरील आवारात, शिवकल्याण समितीच्यावतीने ब्राह्मणपुरी परिसरात, शिवाजी चौकात शिवतीर्थ समितीच्यावतीने भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ला भाग, शिवनेरी चौक, स्फूर्ती चौक, मालगाव वेस, दिंडी वेस, पाटील हौद, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गाडवे चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, कर्मवीर भाऊराव चौक, जवाहर चौक येथेही शिवजयंती साजरी करण्यात आली.

ब्राम्हणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने हिंदमाता चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT