शिराळा शहर : शिराळा तालुक्यात बिबट्यांचा खुलेआम वावर व उसाच्या फडात सतत सापडणाऱ्या बिबट्यांच्या पिलांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांत चार वेगवेगळ्या घटनांमुळे ऊस पट्ट्यात घबराटीचे वातावरण आहे.
शनिवार, दि 6 रोजी कापरी (ता. शिराळा) येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊस तोडीदरम्यान पंधरा ते वीस दिवस वयाची बिबट्याची दोन पिले आढळून आली. वनविभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकामुळे तातडीने याची दखल घेत कार्यवाही सुरू केली.यापूर्वी बुधवार, दि 26 रोजी सकाळी 9 दरम्यान शिवाजी पाटील यांच्या याच शेतामध्ये ऊसतोड सुरु होती. यावेळी पंधरा ते वीस दिवसांची बिबट्याची दोन पिले दिसून आली.
याबाबत वनविभागास याची माहिती देण्यात आली. तातडीने उपवनसंरक्षक सागर गवते, यांच्यासह पथकाने ऊसतोड थांबवून बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे बसविले. पिले ठेवल्यानंतर दोन तासातच मादी बिबट पिले घेऊन गेली. या घटना ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या होत्या. यानंतर पुन्हा शनिवार, दि 6 रोजी तसाच प्रकार घडला. यामुळे परिसरातील पूर्ण ऊसतोड थांबवण्यात आली आहे. कापरी येथे शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये ऊस तोड चालू असताना बिबट्याची दोन पिले आढळून आल्याची माहिती प्राणिमित्र सुशीलकुमार गायकवाड मिळाली. त्यांनी तत्काळ वनाधिकारी अनिल वाजे व दत्तात्रय शिंदे यांना माहिती दिली. लगेचच पथकाने घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील ग्रामस्थांना हटवण्यात आले. पिले सुरक्षित ठेवून तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.
वन विभागाची दक्षता
वनपाल अनिल वाजे, दत्तात्रय शिंदे, सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, युनूस मणेर यांनी या पिलास दूध पाजण्यासाठी शिराळा येथील वनविभाग कार्यालयात आणले. प्रत्येकी 2 तासाच्या अंतराने दिवसभर या पिलांना दूध पाजले. पुन्हा एकदा मादी बिबट व पिलांची भेट घडवून आणण्यासाठी परिसरात सायंकाळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.