सांगली

Shirala ST Shed Collapse: एसटीचे शेड कोसळले; एक गंभीर

शिराळ्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : शिराळा-बिऊर (ता. शिराळा) मार्गावरील सुगंधानगर येथे असलेले एसटीचे पिकअप शेड रविवारी (दि. ५) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे अचानक कोसळल्याने त्याखाली उभे असलेले शिवाजी बाळू जरग गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शिराळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जरग हे त्यांच्या सासू गिरजाबाई गावडे यांना बांबवडे येथे जाणाऱ्या एसटीची वाट पाहण्यासाठी पिकअप शेडमध्ये थांबले होते. त्यावेळी गिरजाबाई गावडे या शेजारील दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पिकअप शेड अचानक कोसळून शिवाजी जरग त्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील राहुल पाटील व श्रीकांत शिंदे यांनी तातडीने धाव घेत शेडखालून शिवाजी जरग यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना त्वरित शिराळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दैव बलवत्तर म्हणून चिमुकली बचावली

याच ठिकाणी घटनेच्या अवघ्या दहा मिनिटांपूर्वी आज्ञा पाटील ही तीन वर्षांची बालिका पिकअप शेड परिसरात खेळत होती. ती तेथून निघून गेल्यानंतर काही मिनिटांतच शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. दैव बलवत्तर म्हणून चिमुकलीचे प्राण वाचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT