हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिराळ्यात नागपंचमी उत्साहात 
सांगली

Shirala Nagpanchami : हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिराळ्यात नागपंचमी उत्साहात

चांगभलंऽऽचा जयघोष; उशिरापर्यंत मिरवणुका

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमी उत्सव सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत, हलक्या पावसाच्या सरीत आणि ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिराळकरांनी जिवंत नागाऐवजी मातीच्या प्रतिमेची पूजा केली, तर दुसरीकडे वन विभागाच्या देखरेखीखाली ४१ नागमंडळांनी जिवंत नागांच्या प्रदर्शनातून सर्पविषयक समाजप्रबोधन केले.

यंदा ४१ जिवंत नाग पकडून समाज प्रबोधन करण्याच्या उपक्रमास मंजुरी मिळाली होती. त्यामुळे शिराळकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला. सन २००२ नंतर जिवंत नाग पाहता आले नव्हते; मात्र गेल्या वर्षी २१, तर यंदा ४१ नागांचे प्रदर्शन भरवण्यात आले.

पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महिला व नागमंडळाच्या सदस्यांनी अंबामातेचे दर्शन घेऊन परंपरेनुसार नागप्रतिमेचे पूजन केले. डीजे, बेंजो व पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. दुपारी दोन वाजता पांडुरंग महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक नायकुडपुरा, गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ व अंबामाता रोडमार्गे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दुपारी १२ नंतर यात्रेत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.

पांढरा नाग व रिल्स स्पर्धेचे आकर्षण

कच्याड युवा शक्ती मंडळाच्या वतीने शैक्षणिक व समाजप्रबोधनाच्या उद्देशाने ठेवण्यात आलेला ‘पांढरा नाग’ यात्रेकरूंच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या मंडळाने 'रिल्स स्पर्धे'चे आयोजन केले होते, तसेच अनेक सोशल मीडिया सेलिब्रिटीजची उपस्थिती यात्रेत चर्चेचा विषय ठरली.

‘जय जिजाऊ’ मंडळाचा डीजेला फाटा

यंदा नव्याने स्थापन झालेल्या 'जय जिजाऊ नागराज मंडळा'ने डीजेला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आदर्श निर्माण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT