सांगली

Shirala Leopard rescue: बिबट्याच्या तीन पिलांची आईशी पुनर्भेट

मायेची हाक! शिराळा येथे थर्मल ड्रोनच्या साहाय्याने वन विभागाची मोहीम यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : शिराळा-पाडळी मार्गावरील गायकवाड मळ्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास निसर्गातील मायेचा एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. दुपारी उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या तीन चिमुकल्या पिलांची वनविभागाने रात्री आईशी यशस्वी पुनर्भेट घडवून आणली. काही तासांच्या विरहानंतर ही पिले पुन्हा आईच्या कुशीत विसावली.

हिम्मत महादेव गायकवाड यांच्या उसाच्या शेतात शुक्रवारी दुपारी उसाचा पाला काढण्याचे काम सुरू होते. यावेळी काही महिला कामगारांना बिबट्याची तीन पिले आढळून आली. त्याचवेळी जवळच असलेल्या बिबट मादीने पिलांच्या संरक्षणासाठी कामगारांच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र, महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे ती उसातून जंगलाच्या दिशेने निघून गेली. बिबट मादी गेल्यानंतर पिले मात्र शेतातच राहिली होती.

या घटनेची माहिती मिळताच सुनील गायकवाड यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनकर्मचारी, रेस्क्यू टीम आणि प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत या पिलांना ताब्यात घेऊन शिराळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सातव यांनी तपासणी केली असता, ही पिले सुमारे दोन महिन्यांची असून पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले.

पिले लहान असल्याने त्यांना आईची गरज ओळखून वनविभागाने रात्री तातडीने पुनर्भेट मोहीम हाती घेतली. ज्या ठिकाणी पिले सापडली, त्याच परिसरात ती पुन्हा ठेवण्यात आली. पिलांच्या आवाजाचा कानोसा घेत, अवघ्या एका तासात बिबट मादी तिथे पोहोचली आणि पिलांना घेऊन गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT