शिराळ्यात वाहतूक कोंडी नित्याचीच; पोलिसांचे दुर्लक्ष  
सांगली

Traffic Jam : शिराळ्यात वाहतूक कोंडी नित्याचीच; पोलिसांचे दुर्लक्ष

लक्ष्मी चौक, बसस्थानक परिसरात वाहनचालकांची कसरत

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : शिराळा शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहनचालकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. वाहतूक पोलिसांची कमतरता, ‘नो पार्किंग’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी नसणे आणि रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करण्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे.

शिराळा बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने एसटी आगारातून बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागते. या परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमित पोलिस बंदोबस्त आणि प्रभावी नियोजनाची गरज आहे.

लक्ष्मी चौकात वाहतूक कोंडी

लक्ष्मी चौक परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. येथे भाजी मंडई असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी विक्रेते बसतात. त्यातच वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोमवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून जात असल्याने कोंडीत आणखी भर पडते. सोमवार पेठ ही शहरातील प्रमुख बाजारपेठ असून, येथे रस्त्याच्या एका बाजूला नियोजित पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसस्थानक परिसरात पोलिस चौकीची गरज

शिराळा बसस्थानक परिसरात पोलिस चौकी नसल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करावी, तसेच शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT