शिराळा शहर : शहर स्वच्छतेसाठी नगरपंचायतीकडून विविध उपक्रम, जनजागृती मोहीम आणि प्रबोधन केले जात असले तरी, शिराळा शहराबाहेरील अनेक रस्ते आणि परिसर आजही कचऱ्याच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील कापरी रोड, बाह्यवळण रस्ता, नाथ रोड, बिरोबा मंदिर परिसर, पाडळी रस्ता तसेच आय.टी.आय. परिसर या भागात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्या, अन्नाचा उरलेला कचरा, कागद, बाटल्या, जुन्या गाद्या आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे रस्त्यांच्या कडेला अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
नगरपंचायतीकडून वारंवार स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात असली तरी, नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कचरा योग्य ठिकाणी न टाकता रस्त्यालगत किंवा मोकळ्या जागेत टाकण्याची प्रवृत्ती अजूनही कायम असल्याने समस्या अधिक गंभीर होत आहे. या परिसरात शेळ्या, कुत्री तसेच इतर भटकी जनावरे वावरत असतात. रस्त्यांवरील कचऱ्यातील प्लास्टिक किंवा घातक पदार्थ खाल्ल्याने या जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. याशिवाय दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका आहे.