शिराळा शहर : शिराळा तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र 39 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली रक्तसाठवणूक केंद्राची (ब्लड स्टोअरेज युनिट) इमारत धूळ खात पडली आहे. 2016/17 यावर्षी हे काम पूर्ण झाले आहे. हे केंद्र सुरू झाल्यास तालुक्यातील शासकीय, खासगी रुग्णालयांतील रुग्णांची सोय होणार आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यासाठी खास प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली होती. परंतु पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.
शिराळा हा डोंगरी तालुका आहे. काही गावांतील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी चालतही जावे लागते. तसेच कराड, कोल्हापूर, सांगली, मिरज, ईश्वरपूर येथे जावे लागते. या बाबींचा विचार करून माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनी तालुक्यात नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय, कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
ग्रामीण रुग्णालयाजवळच असणाऱ्या क्वार्टरमध्येच 39 लाख रुपये खर्चून सर्व सोयींनीयुक्तअशी ही इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ती धूळ खात पडली आहे. इमारतीचा प्रवेशाचा लोखंडी चक्री दरवाजा काढून बाजूला ठेवला आहे. जनरेटर लहान मुलांचे खेळण्याचे साधन बनले आहे. इमारतीत वातानुकूलित व्यवस्था आहे. तसेच येथील साहित्य, फ्रीज आदी आता गंजेल, अशी परिस्थिती आहे.
याबाबत सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय होते. त्यामुळे केंद्रासाठी लागणारी प्रथम संदर्भसेवा केंद्राची मान्यता आवश्यक होती, ती मिळाली नव्हती. मान्यता मिळाल्यावर यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर हे केंद्र सुरू केले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र आता उपजिल्हा रुग्णालय झाल्याने याची मान्यता लागत नाही. त्यामुळे हे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.