मुंबई : सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राड्यात शिवसेना मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की, शिवसेना, राष्ट्रवादी सदस्यांवर झालेला दबावतंत्राचा वापर आणि पोलिसांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक विधिमंडळात झाली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी भाजपकडून आपल्याला सत्तेमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.
जर मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की केली जात असेल आणि मित्र पक्षच आपले निवडून आलेले सदस्य पळवून सत्ता हिरावून घेत असेल तर परिस्थिती गंभीर आहे, याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी संयमी भूमिका घेत हा मुद्दा योग्य त्या ठिकाणी आपण मांडू असा धीर आपल्या मंत्री आणि आमदारांना दिला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांची विशेष बैठक झाली. साताऱ्यातील घटनेमुळे शिवसेनेचे आमदार बैठकीत संतप्त झाले होते.