शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढणार Pudhari photo
सांगली

शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळते. त्यामुळे नदी प्रदूषण होते. दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 94 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्यात येणार आहे. त्यामुळे शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

आयुक्त गुप्ता म्हणाले, महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे लोकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या चार मुख्य समस्या आहेत. त्यावर प्राधान्याने काम केले जात आहे. शेरीनाला प्रकल्प, सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचा ड्रेनेजचा प्रश्न, महापालिका क्षेत्राला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष आहे.

आयुक्त गुप्ता म्हणाले, शेरीनाल्याचा प्रश्न सांगलीकरांना सातत्याने भेडसावणारा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने 94 कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुध्द करून शेतीसाठी वापरण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे.

दिवा बंद पडल्यास 48 तासांत दुरुस्ती :

शहरातील दिवाबत्तीसाठी एलईडी प्रकल्पाची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. शहरात कुठे दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक असल्यास नागरिकांनी याबाबत महापालिकेला कळवावे. दिवाबत्तीची तक्रार आल्यास 48 तासांत दुरुस्ती केली जात असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.गुप्ता म्हणाले, महापालिका क्षेत्रातील भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पिण्याच्या पाण्यासाठी वारणा उद्भव योजना हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 290 कोटींचा प्रकल्प अहवाल शासन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अमृत योजनेतून ही योजना हाती घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

तिन्ही शहरांचा ड्रेनेज प्रश्न डिसेंबरअखेर निकाली

आयुक्तगुप्ता म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांतील जलनिस्सारणाच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे नियोजन केले आहे. दर पंधरा दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहेत. या कामात भूसंपादनाचा मुख्य अडसर होता, तोही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तीनही शहरातील ड्रेनेज योजना 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT