विजय लाळे
विटा : ‘माझा मुलगा प्रचंड संवेदनशील... शाळेच्या अभ्यासातही बरा... त्याला एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये (शालाबाह्य उपक्रम) म्हणजे डान्स, मिमिक्री आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये विशेष रस... पण हाच गुण त्याच्या मुळावर आला. शाळेतील चार-चार शिक्षिकांनी केवळ शाळेत मिमिक्री करतो, म्हणून त्याला वारंवार टॉर्चर (छळ) केले. याबद्दल तो घरात आमच्याशी बोलला, पण आम्ही त्याला, दहा-बारा दिवस कळ काढ, असं बजावलं होतं... पण परवा मंगळवारी जेव्हा त्याला सगळं असह्य झालं, त्यावेळी त्यानं..., ...आता तो तर परत येणार नाही, पण त्या शिक्षकांवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे...’ मृत शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील कातर आवाजात घडलेली घटना सांगण्याचा प्रयत्न करत होते.
मूळच्या सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील प्रदीप पाटील यांचा दिल्लीत राजीवनगर भागात सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा शौर्य तिथेच सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सेंट कोलंबस शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. तेथील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून शौर्यने मंगळवार, दि. 18 नोव्हेंबररोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या दीडपानी सुसाईड नोट, अर्थात आत्महत्यापूर्व पत्रात, ‘शाळेच्या शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, असे लिहिले आहे. याची माहिती मिळताच दिल्ली पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शौर्यचे वडील प्रदीप हे दोनच दिवसांपूर्वी मंगळवारी आई आजारी असल्याने गावी ढवळेश्वरला आले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. आल्या पावली ते दिल्लीला परतले. त्यानंतर गुरुवारी एअर ॲम्ब्युलन्सने शौर्यचे पार्थिव ढवळेश्वरला आणण्यात आले. सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दिल्लीच्या राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी संबंधित शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन व ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप पाटील म्हणाले, खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून, दिल्लीतील संबंधित शाळेवर आणि शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापही या आत्महत्येप्रकरणी शाळेतील शिक्षकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वतंत्र जबाब घेतले जावेत आणि संबंधित चार शिक्षिकांवर आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.
ते म्हणाले, शौर्यला शाळेत त्रास दिला जात होता. सोमवारी रात्रीही आम्ही त्याच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यानंतर मंगळवारी पहाटे मी दिल्लीहून इकडे ढवळेश्वरला आलो. दुपारी येऊन इथे पोहोचतो न् पोहोचतो, तोच मला आमच्या वाहन चालकाचा फोन आला. त्याने शौर्य मेट्रो परिसरात रस्त्यावर पडला आहे, गंभीर जखमी झाला आहे, असे सांगितले. मी तातडीने माझ्या लोकांना तिथे पाठवले. शाळेचा गणवेश, गळ्यात आय कार्ड, स्कूल बॅग तशीच होती. दरम्यान, याबाबत आमदार सुहास बाबर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर बोलून, प्रदीप पाटील यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याचे सांगितले.