मिरज : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे राजकारण हे नेहमी भारतीय जनता पक्षाच्या फायद्याचे राहिले आहे. आतापर्यंत शरद पवार यांनी पुरोगामी राजकारण करण्याचे केवळ नाटक केले, मात्र यापुढे जनता त्यांचे हे नाटक चालू देणार नाही, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी रविवारी मिरज येथे केली.
मिरजेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला, यावेळी सुजात आंबेडकर बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुजात आंबेडकर म्हणाले, "वंचितला भाजपची बी-टीम म्हणणारे विरोधी पक्षच प्रत्यक्षात भाजपच्या सोयीचे राजकारण करत आहेत. काँग्रेस आणि उबाठा गटाला बॅकफूटवर आणण्याचे काम शरद पवार करत असून, त्यांची भूमिका नेहमी भाजपला मदत करण्याची राहिली आहे. देशात एकीकडे भाजपची पीछेहाट होत असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भाजपला विरोध करण्याची खरी ताकद केवळ वंचितमध्येच असल्याने तरुण व कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडे आहे. भाजपला हरवायचे असेल तर बॅलेटच्या माध्यमातूनच हरवावे लागेल."