सांगली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आज, शुक्रवारी (दि. 4) सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण दुपारी चार वाजता सांगलीतील मराठा समाज संस्थेत होणार आहे. या कार्यक्रमात नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्याचे पाईक बहिर्जी नाईक, वीर शिवा काशीद यांच्या वंशजांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सुरेश खाडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विशाल पाटील, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, आ. सुधीर गाडगीळ, आ. अरुण लाड, आ. सुमन पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर आदी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मराठा समाज संस्था कार्यालयाच्या बाजूस मंडप उभारला आहे. कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशन व महाराजांच्या सरदारांचे वंशज व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, माजी खासदार संजय पाटील, संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी दिली.
खासदार शरद पवार यांच्याहस्ते सकाळी नऊ वाजता सांगलीतील सिनर्जी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते बुर्ली (ता. पलूस) येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते विटा येथे दुपारी 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी होईल. त्यानंतर ते एनएच-160 च्या विटा-सांगली महामार्गाची हवाई पाहणी करतील. सायंकाळी 5.45 वाजता एनएच-166 च्या सांगली - कोल्हापूर महामार्गाचीही हवाई पाहणी करतील.