सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने रविवारी आंदोलन करण्यात आले.
कवलापूर येथे बाधित शेतकरी व महिला यांनी द्राक्षबागा, ऊसशेती उद्ध्वस्त करून बेरोजगार, भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, यासाठी शेतकरी एकजुटीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शक्तिपीठ महामार्ग लादणार्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय... या व इतर जोरदार घोषणा देऊन निषेध केला. तसेच राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग लादलेल्या धोरणाच्या व शेतकर्यांवर आलेल्या संकटाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपतींचा भगवा झेंडा वावरात रोवून शासनाला इशारा देण्यात आला. महामार्ग करण्याअगोदर आमच्या वावरातील आमची अस्मिता, आमचा प्राण असणारा छत्रपतींचा भगवा झेंडा वावरातून काढून दाखवावा. झेंडा काढणे म्हणजे आमचा प्राण घेणे. आम्ही जिवंत असेपर्यंत शक्तिपीठ महामार्गासाठी एकही इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार यावेळी सर्व बाधित शेतकर्यांनी केला. जिल्हाभरात बुधगाव, मणेराजुरी, गव्हाण, डोंगरसोनी, घाटनांद्रे, नागाव कवठे, तिसंगी या व इतर बाधित गावांमध्ये छत्रपतींचा भगवा झेंडा वावरात लावून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन अतितीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते विनोद लगारे, श्रमिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब यादव यांनी लढ्याला पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, शरद पवार- गव्हाण, घन:श्याम नलावडे, भूषण गुरव, प्रवीण पाटील, अधिक पाटील, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, गजानन सावंत, हणमंत सावंत, प्रकाश टकले, शेरखान पठाण, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, दत्तात्रय बेडगे, सिध्देश्वर जमदाडे, गजानन पाटील, राधिका नलावडे आदी उपस्थित होते.