सांगली : सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातच प्रति सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे सरकारने ही गोष्ट ध्यानात ठेवून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न झाल्यास, प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा शक्तिपीठविरोधी मोर्चात नेत्यांनी शुक्रवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत दिला. दरम्यान, सरकारच्या वतीने महामार्ग मोजणीसाठी प्रयत्न झाल्यास सर्वांनी एकत्रित येऊन त्याला विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्त्री-पुरुष सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आले. त्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, महादेव जानकर, धनाजी गुरव, बी. जी. पाटील, रणजित नाईक, दीपक लाड, रविराज साबळे, अभिजित पाटील, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.
पंढरपूर, तुळजाभवानीसाठी मार्ग बदलता येतो; मग ‘शक्तिपीठ’चा अट्टाहास कशासाठी?
शक्तिपीठ महामार्गाबाबत जयंत पाटील म्हणाले, ‘पंढरपूर मंदिरापासून रस्ता लांब नेला, तुळजाभवानी मंदिरापासून रस्ता लांब नेला; मग हा शक्तिपीठ महामार्ग कसा? कोणाची व्यवस्था करण्यासाठी हा महामार्ग केला जात आहे, याचा सरकारने खुलासा करावा. शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांची उपजीविका आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार न करता सरकारने कोणताही निर्णय लादू नये.
सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी
शक्तिपीठ महामार्गाचा विरोध आता केवळ सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही. परभणी, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्यांमध्येही या प्रकल्पाविरोधात मेळावे होत असून, जनतेचा प्रचंड विरोध असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्व जिल्ह्यांतून विरोध होत असताना सत्ताधारी पक्षातील एकही आमदार शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलायला तयार नाही. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, ते स्पष्ट करा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊद्या. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा उद्योग आता बंद केला पाहिजे, असेही ते म्हणाले.