सांगली : शासनाकडून मागविण्यात आलेल्या हरकतीवर सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित सर्व गावांतील बाधित शेतकर्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. हजारो शेतकर्यांनी हरकतीवर सुनावणीवेळी आपले म्हणणे सविस्तर मांडले आहे. सर्व शेतकर्यांचा या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे सुनावणीचा फार्स करण्यापेक्षा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
दरम्यान, या मागणीबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत दिगंबर कांबळे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी आमच्या वावरात संयुक्त मोजणी किंवा कसलाही सर्व्हे करण्यासाठी व याबाबत संवाद साधण्यासाठी कोणत्याही अधिकार्यांनी येऊ नये.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा व आमच्या जमिनी वाचवाव्यात. शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, तसेच वारणा कृष्णा नदी काठावरील गावातून हा महामार्ग जाणार असल्याने महामार्गासाठी पडलेल्या भरावामुळे तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यामुळे पुराचा प्रचंड मोठाधोका निर्माण होणार आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 8 वाजता अन्नत्याग आंदोलन तीव्र निदर्शने व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे, तरी सांगली जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकर्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात येत आहे.
शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत, राहुल जमदाडे, अमर शिंदे, वामन कदम, शिवाजी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.