विटा : खानापूर तालुक्याने आजवर कुठल्याही विकास कामाला विरोध केलेला नाही परंतु या शक्तीपीठ महामार्गात तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांची ५५५ एकर जमीन जाऊन काही जण भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला तीव्र विरोध करत आहोत अशी भूमिका ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब मुळीक यांनी मांडली.
नव्याने प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात खानापूर तालुक्यातील माहुली, भाळ वणी पाठोपाठ भाग्यनगर मध्ये मोठा जन आक्रोश निर्माण झाला आहे. हा महामार्ग आपल्या भागावर जबरदस्ती ने लादला जात असल्याचा आरोप करत येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब मुळीक यांनी भाग्यनगर येथे जनजागृती सभा झाली. यावेळी किसनराव जानकर, संग्राम देशमुख, नागेवाडी विकास सोसाचे अध्यक्ष संभाजी निकम, संपतराव यादव, संपतआण्णा निकम, जयराम जगताप, प्रेमानंद जगताप, संताजी जगताप आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
या वेळी मुळीक म्हणाले, नियोजित शक्तीपीठ महामार्ग माहुली गावात खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.पुढे वलखड -चिखलहोळ- नागेवाडी-भाग्यनगर-घानवड-हिंगणगादे-भाळवणीहून पुढे कडेगाव तालुक्याकडे जात आहे. आपण कुणीही विकासकामांना कधीही विरोध केलेला नाही. यापूर्वी माहुली गावातील टेंभूची विहीर, वीज मंडळाचे सबस्टेशन, पंपहाउस, टेंभू मुख्यकालवा, बारामती-सांगली रस्ता रुंदी करण तसेच टेंभू योजनेच्या स्लॅब मुळे अगोदर च माहुली गावातील २५० ते ३०० एकर जमीन गेलेली आहे.
वांग मराठवाडी धरणातील उमर कांचन गावाचे पुनर्वसन माहुलीतच झालेले आहे. शिवाय प्रस्तावित ग्रीनफिल्ड हायवे माहुलीतून जाणार आहे,असे असताना आता शक्तीपीठ महामार्गासाठी माहुली गावातील ७३ गटातील ४५ हेक्टर म्हणजेच ११२ एकर ५० आर जमीन जाणार आहे. यापूर्वी ह्या भाग्यनगर गावाची जमीन तलावात गेलेली आहे. आता ९० गटातील ३९.७५ हेक्टर म्हणजे १३७ एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे. नागेवाडी, घानवड गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी यशवंत साखर कारखाना, सूतगिरणी, टेक्सटाइल पार्क यासाठी जमीनी दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त दौंड ते संकेश्वर या महामार्गा च्या रुंदीकरणातही भाग्यनगरच्या जमीनी गेल्या आहेत.
पुढे नागेवाडी व घानवड गावातील अनुक्रमे ५२ व १०६ गटातील ५०-५० एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे. भाळवणीत ताकारी मुख्य कालव्यासाठी आधी जमिनी गेल्या आहेतच.या गावात आता शक्तीपीठ महामार्गासाठी ८८ गटातील १४५ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. चिखलहोळ मधील ३६ एकर, हिंगणगादे मधील २४.५० एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे. याशिवाय या सर्व गावात टेंभू च्या स्लॅबमुळे शेतकऱ्यांच्या ८ एकर वरील जमीनी संपादित झालेल्या आहेत. त्यामुळे ८ एकरात दोन-तीन भावाभावात वाटण्या होऊन आधीच दोन-तीन एकर शेती शेतकऱ्यांकडे राहिलेली आहे. त्यात आणखी शक्तीपीठ महामार्गासाठी जमीनी दिल्यास अनेक शेतकरी भूमीहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा नागपूर रत्नागिरी (क्र.एन एच 166) हा ९२५ किमी चा महामार्ग तुळजापूर, माहूर, कोल्हापूर या प्रमुख शक्ती पीठाच्या जवळून जात असताना शासनाने नव्याने शक्ती पीठ महामार्ग करण्याचा घाट केवळ कोणाचे तरी भले व्हावे म्हणून घातला आहे.
पूर्वीचा शक्तीपीठ महामार्ग ८०२ किमीचा प्रस्तावित होता. हा मार्ग शेटफळे- बानुरगड- जरंडी- कवलापूर-बुधगाव असा जात होता. त्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तो रद्द करून त्या गावांनी नाकारलेला मार्ग बदलून हा नवा ८५६ किमीचा हा महामार्ग आपल्या तालुक्यातून वळविला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा उभा करावा अन्यथा हातचोळत बसण्या पलीकडे तुमच्याकडे पर्याय उरणार नाही असा इशाराही बाबासाहेब मुळीक यांनी दिला. रोहित काटकर यांनी हा नवीन शक्तिपीठ महामार्ग केवळ बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी उभारला जात आहे. यांत कंत्राटदारांच्या कमिशन मधून मोठा निधी कोणाच्या तरी खिशात जाणार आहे असा थेट आरोप केला. यावेळी दीपक काटकर, रवी काटकर यांचीही भाषणे झाली.
यावेळी तानाजी काटकर, संतोष जगताप, सोन्याभाऊ काटकर, आबासो जगताप, भीमराव निकम, बाबुराव जगताप, जगन्नाथ काटकर, भीमराव जगताप, पतंगराव काटकर, पोपट जगताप, चंद्रकांत जगताप, सुरेश जगताप यांच्यासह नागेवाडी, भाग्यनगर येथील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.