सांगली

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’मुळे ‘वाकुर्डे’ योजनेला फटका

पाईपलाईनचे नुकसान : सिंचनाखालील ७ हजार ७६ एकर क्षेत्र बाधित होण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा
मारुती पाटील

ईश्वरपूर : गेल्या तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचे पाणी वाळवा तालुक्याला मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. मात्र, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश मुख्य पाईपलाईन बाधित होण्याची शक्यता आहे. परिणामी, या योजनेबरोबरच सहकारी व खासगी पाणीपुरवठा योजना तसेच विहिरी व बोअरच्या सिंचनाखालील सुमारे ७ हजार ७६ एकर क्षेत्राला फटका बसण्याचा धोका आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील ११ गावांमधील १ हजार ३६३ गटांतील ८५२.८३ एकर क्षेत्र जाणार आहे. यातील बहुतांश जमीन सुपीक व सिंचनाखालील असल्याने तालुक्यात महामार्गाला विरोध होत आहे. एकीकडे प्रशासनाने भूसंपादनासाठी हालचाली सुरू केल्या असताना दुसरीकडे विरोधाची तीव्रताही वाढत आहे. सध्या वाळवा तालुक्यात वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाईपलाईनचे काम सुरू असून, सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी ३८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. शक्तिपीठ महामार्ग ज्या येडेनिपाणी-इटकरे परिसरातून जाणार आहे, त्या भागात महामार्गाच्या मार्गातच योजनेतील बहुतांश पाईपलाईन येत असल्याने वाकुर्डे योजनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

वाकुर्डे योजनेचे लाभक्षेत्रही बाधित

सन १९९५-९६ मध्ये वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेच्या लाभक्षेत्रात वाळवा तालुक्यातील ५० गावांमधील ३७ हजार ५०१.२५ एकर क्षेत्राचा समावेश आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गावरील ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळूप आणि ऐतवडे खुर्द या सात गावांतील ९ हजार ६१६ एकर क्षेत्र योजनेच्या लाभक्षेत्रात येते. याच गावांमधून प्रस्तावित महामार्ग जाणार असल्याने वाकुर्डे योजनेच्या लाभक्षेत्रातील ७६६.४५ एकर क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. १३३ विहिरी मुजण्याचा धोका प्रस्तावित महामार्गाच्या मार्गात १६ सहकारी पाणीपुरवठा योजनांच्या, तसेच ७४० खासगी पाणीपुरवठा योजनांच्या पाईपलाईन येत आहेत. याशिवाय १३३ विहिरी आणि ७४ बोअरवेल बाधित होण्याची शक्यता आहे.

सहकारी पाणीपुरवठा योजनांखालील १२ हजार ८०० एकर क्षेत्रापैकी ४ हजार १५ एकर, खासगी पाणी योजनांच्या ३ हजार ८६५ एकर क्षेत्रापैकी १ हजार ५५६ एकर, तर विहिरी व बोअरच्या सिंचनाखालील १ हजार ८१५ एकर क्षेत्रापैकी १ हजार ५०५ एकर क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण ७ हजार ७६ एकर सिंचनाखालील क्षेत्राला शक्तिपीठ महामार्गाचा फटका बसण्याचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT