सांगली : शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा..असे न झाल्यास शक्तिपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू.. अशा घोषणा देत गव्हाण येथे शक्तिपीठ महामार्ग प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले .
शासनाला शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत, गेली दीड वर्षापासून शेतकर्यांनी फोडलेला टाहो ऐकू येत नाही, शेतकर्यांच्या बाबतीत शासन दगड झाले आहे.. म्हणून आज शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकर्यांनी दगडाच्या शासनाची पूजा आरती करण्यात आली . शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती संघर्ष करीत आहेत.
शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्यासाठी बाधीत शेतकर्यांनी हजारो हरकती संबंधित भूसंपादन अधिकार्यांकडे दिलेल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन प्रांताधिकारी यांनी हरकती फेटाळल्या आहेत. शेतकर्यांचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाहीने मोजणी करण्याचा घाट शासना कडून घालण्यात आला. जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व बाधीत शेतकर्यांनी मोजणी अधिकार्यांना हाकलून देत प्रचंड विरोध करीत मोजणी होऊ दिली नाही. शासनाला वारंवार निवेदने देऊनही शासन दडपशाही करीत आहे.
मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे, काँग्रेस किसान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष जोतीराम जाधव, गव्हाणचे सरपंच हणमंत पाटील, माजी उपसरपंच दत्ता पवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे, संपर्क प्रमुख शरद पवार, राज्य प्रवकता दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत आदी उपस्थित होते.