सांगली ः शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची बुधवारी राज्यातील सांगलीसह 11 जिल्ह्यांतील अधिकार्यांसमवेत बैठक झाली. त्यात शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी दोन महिन्यांत मोजणी करून रक्कम निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार, हे स्पष्ट झाले आहे.
‘समृद्धी’च्या धर्तीवर महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाने नागपूर ते गोवा अंतर 10 तासांत पार करण्यासाठी नागपूर ते गोवा शक्तिपीठ प्रकल्प हाती घेतला आहे. 86 हजार कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग राज्यातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. 805 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग बांधण्यासाठी 2024 मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यासाठी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह राज्य सरकारकडे पाठविला; मात्र या महामार्गाला कोल्हापूर आणि सांगलीत विरोध झाल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर मागे घेतला होता. सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली; पण आता राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचेही आदेश दिले आहेत.
आदेशानंतर तत्काळ एमएसआरडीसीने पर्यावरण परवानगीसंबंधीचा प्रस्ताव दि. 10 जानेवारीला केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता त्यापुढे जात या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंडळाने ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, भूसंपादनचे अधिकारी, भूमिअभिलेख अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेतली. दोन महिन्यांत मोजणी करण्याचे आणि रक्कम निश्चित करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. त्यानुसार मिरज आणि विटा प्रांताधिकारी यांना ही जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे नियोजनाप्रमाणेच हा महामार्ग होणार, हे निश्चित झाले आहे.
शक्तिपीठ महामार्गास कोल्हापूर जिल्ह्यात विरोध झाल्यानंतर या जिल्ह्यास वगळण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातूनही शेतकर्यांचा विरोध आहे; मात्र त्याची दखल घेतली गेल्याचे दिसून येत नाही.
आटपाडी तालुका : शेटफळे. कवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी. तासगाव तालुका : डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.