सांगली ः अनेक पोलिस ठाण्यांना हक्काचा मोकळा भूखंड उपलब्ध नसल्याने पोलिस ठाण्याबाहेर व परिसरात विविध गुन्ह्यांखाली जप्त केलेली वाहने सांभाळणे पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. सांगलीतील शहर पोलिस ठाण्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेली मोठी वाहने ठाण्याबाहेर रस्त्यावरच लावली आहे. वाहने रस्त्यावर पार्क केल्याने चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी आठवडा बाजाराच्या दिवशी तर चौकात जीव मुठीत धरूनच जावे लागते. पोलिसांनी जप्त केलेली वाहने सर्वसामान्यांसाठी ताप ठरत आहेत.
सांगली शहरात चार पोलिस ठाणी, एक उपअधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय आहे. चार पोलिस ठाण्यांपैकी शहर पोलिस ठाण्याकडे मोकळी जागा फारच कमी आहे. इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत शहर पोलिस ठाण्याची स्थिती वेगळी आहे. त्यात बाजारपेठेकडे जाणार्या मुख्य चौकात पोलिस ठाणे आहे. समोरच महापालिका मुख्यालय, तर बाजूला भारती विद्यापीठाचे कार्यालय असून बसस्थानक, कोल्हापूर, पुण्याकडे जाणार्या वाहनांना याच चौकातून मार्गस्थ व्हावे लागते. त्यामुळे महापालिकेचा हा चौक वाहनांच्या गर्दीत हरविला आहे. त्यातच पोलिस ठाण्याच्या आवारात आणि बाहेरील बाजूला जप्त केलेली वाहने पार्क केली आहेत. आवारात दुचाकी वाहने लावली आहेत. यात दुचाकी, सायकली, चारचाकी वाहने, ट्रक, डंपर, कंटेनर, तर काही गाड्यांचे सांगाडे ठाण्याच्या जागा अडवून आहेत. या वाहनांमुळे पोलिस ठाणेही विद्रुप दिसत आहे. त्याचप्रमाणे काही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे.
पोलिस ठाण्याबाहेर जप्त केलेली चारचाकी व अवजड वाहने लावण्यात आली आहेत. जप्त केलेल्या अनेक वाहनांना गंज लागला आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मूळ मालक पोलिसांना सापडले नसल्याने व वाहन मालकांनीही वाहने परत नेण्याची तसदी न घेतल्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तशीच पडून आहेत. पण या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहर पोलिस ठाण्यासमोरच दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. त्या दिवशी तर येथून चालत जाणेही नागरिकांना अशक्य होते. ही वाहने हटवून त्यांचा इतरत्र बंदोबस्त करण्याची मागणीही होत आहे.