सांगली : स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त सांगली करण्याची जिद्द ठेवा, तरच शहरात गुंतवणूक येऊन विकास होईल, असे प्रतिपादन मावळते आयुक्त सत्यम गांधी यांनी केले. आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात पालकमंत्री, आमदार, खासदारांनी कोणतेही चुकीचे काम सांगितले नाही. त्यामुळे धाडसी निर्णय घेऊ शकलो. माझी बदली कुणाच्या दबावामुळे झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पदाधिकारी, प्रशासन व नागरिक यांच्यावतीने रविवारी महापालिकेच्या सभागृहात त्यांचा निरोप समारंभ झाला. यावेळी गांधी यांचा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते मैनुद्दीन बागवान, युवराज गायकवाड, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील उपस्थित होते. गांधी म्हणाले, आपल्या करिअरच्यादृष्टीने पुढे जावे लागणार आहे. म्हणून बदली करुन घेतली. यामध्ये कोणताही दबाव नाही. अतिक्रमणमुक्त, स्वच्छ शहर झाल्यास मोठी गुंतवणूकही येईल आणि विकास शक्य आहे.