सांगली

Ancient Artifacts: उपाळे (मायणी) येथे सापडले सातवाहनकालीन जाते

दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठेवा

पुढारी वृत्तसेवा

नेवरी : सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळांच्या अभ्यासासाठी उपाळे-मायणी (ता. कडेगाव) परिसराचे निरीक्षण करीत असताना नेर्ले येथील इतिहास अभ्यासक संजय साळुंखे-पाटील यांना प्राचीन सातवाहनकालीन जाते आढळून आले. माजी सरपंच शंकर नारायण घार्गे यांच्या घराच्या आवारात हे वैशिष्ट्यपूर्ण जाते असून त्यावरून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे.

दक्षिण महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा कोल्हापूर आणि कराड या भागात आढळून येतात. तत्कालीन इंडो-रोमन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे आहेत. मागील वर्षी नेर्ले (ता. वाळवा) येथे सातवाहनकालीन दोन हजार वर्षांपूर्वीचा पाटा शोधण्यामध्ये साळुंखे-पाटील यांना यश आले होते. तेव्हापासून या भागातील ऐतिहासिक अवशेषांचा शोध घेतला जात आहे. उपाळे-मायणी हे गाव नांदणी नदीच्या काठावर आहे. या परिसरामध्ये पांढऱ्या मातीच्या टेकड्या आहेत. या अभ्यासादरम्यान इतिहास अभ्यासक संजय पाटील यांना उपाळे-मायणी येथे सातवाहनकालीन जाते आढळून आले.

इसवीसनाच्या पहिल्या शतकापूर्वी धान्य दळण्यासाठी जाती वापरली जात नव्हती. या काळात महिला रात्रभर धान्य भिजत ठेवत. सकाळी त्याचे दगडी पाट्यावर वरवंट्याच्या साहाय्याने वाटण करून जाडीभरडी भाकरी बनवून ती विस्तवावर भाजून खाल्ली जात असे. मानवी संस्कृतीच्या इतिहासात प्रथम पाटा-वरवंटा आणि उखळीचा व त्यानंतर जात्याचा शोध लागला असावा. कारण जाते हे पाटा- वरवंट्याची सुधारित आवृत्ती आहे.

उपाळे-मायणी येथे सापडलेल्या या जात्याचा आकार हंड्यासारखा आहे. या जात्याचा खालील भाग पातळ, पण वरचा भाग खूप उंच वजनदार अशा दगडाचा आहे. जात्याचे दोन्ही भाग जात्याची तळी म्हणून ओळखले जातात. खालची तळी स्थिर असून त्या तळीच्या मध्यभागातील छिद्रामध्ये बसवलेल्या लाकडी खुंट्याभोवती वरची तळी फिरण्याची व्यवस्था केलेली आहे. वरच्या तळीला जाते फिरवण्यासाठी लाकडी दांडा बसवण्यासाठी समोरा-समोर दोन छिद्रे पाडलेली आहेत.

वरील बाजूने धान्य टाकण्याची सोय आहे. दोन महिला समोरासमोर बसून आडव्या दांड्याच्या मदतीने वरती तळी फिरवत मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिद्रातून जात्यामध्ये धान्य टाकत. दोन्ही तळ्यांच्या घर्षणामुळे धान्याचे पीठ होऊन ते दोन तळ्यांच्या कडेला असणाऱ्या फटीतून बाहेर पडत असे. अशी जाती जुन्नर आणि कराड परिसरामध्ये सापडली आहेत. सातवाहन काळातील लोकवस्ती ही कृषी, व्यापार आणि कारागिरी यावर आधारित होती. नदीकाठची साधी खेडी आणि व्यापारी शहरांची दुहेरी रचना, हे त्या कालखंडाचे वैशिष्ट्य होते.

कडेगाव तालुक्यातील उपाळे- मायणी या गावात सातवाहनकालीन जाते मिळाले. यावरून सातवाहन काळामध्ये या भागामध्ये मानवी वस्ती असल्याचे सिद्ध होते. या दगडी जात्यांमुळे गाव व परिसरातील प्राचीन काळातील इतिहासाच्या पाऊलखुणा उलघडण्यास मदत होणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे.
- संजय साळुंखे-पाटील इतिहास अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT