श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा  
सांगली

Satara News : जिल्हावासीयांचा आज माऊलींना निरोप

बरडला ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’चा अखंड गजर : सोहळा पंढरीकडे

पुढारी वृत्तसेवा

योगेश निकाळजे

विडणी :

‘‘योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।

शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।।

विश्व रागे झाले वणी । संती सुखे व्हावे पाणी ।

विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।’’

हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय संगतीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी फलटण येथील मुक्कामानंतर शनिवारी बरड येथे विसावला. सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम बरड येथे पार पडल्यानंतर हा पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

सातारा जिल्ह्यात १५ जुलैपासून असलेल्या पालखी सोहळ्याने लोणंद, तरडगाव आणि फलटण येथील मुक्काम पूर्ण केल्यानंतर शनिवारी सकाळी विडणीत आगमन केले. सकाळी ९.२० वाजता पालखी तळावर सोहळा विसावल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी माऊलींचे फुलांच्या वर्षावात आणि हरिनामाच्या जयघोषात स्वागत केले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी तळावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

यावेळी सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ. मनीषा नाळे, ग्रामविकास अधिकारी अंकुशराव टेंबरे, श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, पोलिस पाटील शीतल नेरकर, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, विडणी सोसायटीचे अध्यक्ष विलास अभंग यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वारकऱ्यांसाठी गावातील विविध तरुण मंडळांनी जेवण, चहा-नाष्टा व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था केली होती. सकाळी १०.१० वाजता पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी रवाना झाला.

सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी सोहळा पिंप्रद येथे पोहोचला. तेथे माऊलींच्या पादुकांना अभिषेक करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. हरिनामाच्या जयघोषात पिंप्रद, राजाळे, सरडे, निंबळक, सोनवडी, वडले आदी गावांतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी अडीचपर्यंत पालखीचा विसावा येथे होता. त्यानंतर वाजेगाव पालखी तळावर अल्पविश्रांती घेत सोहळा सायंकाळी सुमारे सात वाजता बरड येथे पोहोचला. बरड ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केल्यानंतर रात्री पालखी तळावर सामुदायिक आरती पार पडली. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT