लोणंद : लोणंद ते शिरवळ रस्त्यावर वाघोशी खिंडीनजीक बुधवारी झालेल्या भीषण कार अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. शिरवळकडून लोणंदकडे येणारी स्विफ्ट कार निरा-देवघर कॅनॉलच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या 50 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने हा अपघात झाला.
या अपघातात जीवनसिंग उर्फ जस्सी गोपाळसिंग रजपूत (वय 22, रा. लोणंद) व अन्य एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर चेतन सुनील शिंदे (वय 24, रा. कोऱ्हाळे, ता. फलटण), दुर्गेश माधव धायगुडे (वय 22, शेळके पाटील वस्ती, लोणंद) व रोहित सुखदेव भोई (वय 24, इंदिरानगर, लोणंद) हे गंभीर जखमी झाले आहेत. जीवनसिंग व त्याचे मित्र हे लोणंदहून शिरवळकडे निघाले होते. स्विफ्ट कार भरधाव वेगात होती. लोणंदपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या निरा-देवघर कॅनॉलच्या सुरू असलेल्या पाईपलाईनच्या खोदकामातील खड्ड्यात जाऊन कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने खोल खड्ड्यात जोरात आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात कारमधील पाचही युवक अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. खोल खड्ड्यात कोसळलेली कार क्रेनच्या साह्याने मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. कारमध्ये अडकलेल्या युवकांना बाहेर काढून तातडीने लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.