सांगली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी सिलिंडरचे वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. यासाठी नियुक्त दक्षता व फिरत्या पथकांमार्फत आजअखेर 45 गॅस एजन्सींची तसेच 40 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये कालपर्यंत एकूण 71 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, सांगलीतील एक आणि मिरजमधील दोघे अशा एकूण तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रार येणाऱ्या एजन्सीवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार एचपीसीएल कंपनीचा 2784 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 245 मेट्रिक टन व आयओसीएल कंपनीचा 60 मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.