सोनी : दूषित पाण्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या कारणावरून जवान विजय तोडकर यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी, सरपंच अमोल वाघमारे यांच्याविरोधात पुकारलेले आजी-माजी सैनिक संघटनेचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. सरपंच वाघमारे यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीर माफी मागितल्यानंतर आणि माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. आंदोलनात जवळपास पाचशेहून अधिक आजी-माजी सैनिक सहभागी झाले होते.
करोली (एम.) येथील जवान विजय तोडकर सुटीसाठी गावी आले असताना, त्यांना पाण्याच्या टाकीत अळ्यामिश्रित दूषित पाणी आढळले. त्यांनी तत्काळ यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. यावरून करोली (एम.)चे सरपंच अमोल वाघमारे यांनी जवान विजय तोडकर यांना फोन करून शिवीगाळ केली. परत सुटीवर आल्यावर तुझ्या अंगाची कातडी काढून वाळत घालतो, अशी धमकीही त्यांनी दिली. इतकेच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही घरी जाऊन धमकी दिल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील, माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.
या घटनेनंतर आजी-माजी सैनिक संघटनेने करोली (एम.) येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवार, 14 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील 110 आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सभासद करोली (एम.) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रथमतः त्यांनी गावातून रॅली काढली आणि त्यानंतर हनुमान मंदिरासमोरील शहीद प्रताप पाटील चौकात आंदोलन सुरू केले.
दुपारी एकच्या सुमारास सरपंच अमोल वाघमारे आंदोलनस्थळी उपस्थित झाले. माझ्याकडून अनावधानाने जवान विजय तोडकर यांना शिवीगाळ झाली आहे, त्याबद्दल मी माफी मागतो, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि माफीनामा लिहून दिला. यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी एकच्या सुमारास सैनिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी ध्वनिक्षेपकावरून, सरपंचसाहेब आंदोलनस्थळी येत आहेत, असे पुकारले. त्यावेळी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी, ‘सरपंचसाहेब म्हणू नका, फक्त सरपंच म्हणा... सैनिकांना शिवीगाळ करणारा साहेब होऊ शकत नाही’, असे म्हणत मोठा गदारोळ केला.