सरदार शहाजी शिंदे यांची समाधी कोसळली 
सांगली

Sangli : सरदार शहाजी शिंदे यांची समाधी कोसळली

कुंडलापूर येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोळचे नातलग असलेल्या सरदार शहाजी राणोजी शिंदे यांच्या कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील समाधीचा काही भाग काल कोसळला. इतिहासाची साक्ष देणार्‍या या समाधिस्थळाचा पाठीमागील भाग कोसळल्याने, किमान आता तरी पुरातत्व विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

कवठेमहांकाळपासून सुमारे 10 किलोमीटरवर कुंडलापूरच्या पूर्वेला हे समाधिस्थळ आहे. आदिलशाही काळात वाघोली, गर्नेवाडी, ढालगाव, तिसंगी व कुंदनग्राम (सध्याचे कुंडलापूर) या पाच गावांची जहागिरी शहाजी शिंदे यांच्याकडे होती. आदिलशहाची विजापूर-गुहागर मार्गावरील रसद खानापूर येथे होती. एकेदिवशी ही रसद तोडण्यासाठी गेलेल्या शहाजी राणोजींना नागज घाटात भीषण युद्धात वीरमरण आले. पत्नी सावित्रीबाई व सईबाई सती गेल्या. त्यांच्यासह शहाजींचे विश्वासू सैनिक, घोडा व कुत्र्यांची समाधीही बांधण्यात आली. पण हे स्मारक दुर्लक्षित आहे. समाधीवरील शिलालेख, सतीच्या हाताची खूण, गावकुस व प्राचीन चौथरे आजही अस्तित्वात आहेत; पण त्यांच्या डागडुजीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. यासंबंधी पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष घालून या समाधीचे जतन करावे, तसेच या वीर परंपरेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT