सांगली

संतोष कदम खूनप्रकरण : चार महिन्यांपासून फरार सिद्धार्थ चिपरीकरला अटक

मोहन कारंडे

सांगली / कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणातील फरारी संशयित सिद्धार्थ ऊर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी) याला कागल (जि. कोल्हापूर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. चिपरीकर चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चिपरीकरला हजर केले असता १८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील आणखीन एक संशयित आरोपी शहारूख शेख हा अद्यापही फरारी आहे. दोघे संशयित सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी आदेश दिले होते. या खुनप्रकरणी संशयित नितेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे या तिघांना खुनाच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली आहे ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नांदणी रस्त्यावर कोप्पे यांच्या शेताजवळ सांगली येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून ७ फेब्रुवारी रोजी झाला होता. संतोषच्या खुनामुळे सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय, मनपा, पोलीस यंत्रणा सुद्धा खडबडली होती. संतोषवर यापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता, तो पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला होता. हल्लेखोरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तो मागे घेण्यासाठी संतोषला वारंवार धमक्या सुद्धा येत होत्या. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक असलेल्या पैलवानाचा समावेश होता, असे प्रफुल्ल कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT