सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा आता सांगली महापालिकेच्या नवीन आयुक्त असणार आहेत.
सत्यम गांधी यांनी महापालिकेचे आयुक्त व प्रशासक पदाची सूत्रे दि. 16 एप्रिल 2025 रोजी घेतली होती. त्यांनी महापालिकेत प्रामुख्याने प्रशासकीय सुधारणा केली. आर्थिक शिस्त लावली. कामांच्या बिलांमध्ये पारदर्शकता आणली. महापालिका कर्मचारी पदोन्नती, अनुकंपा नियुक्ती मार्गी लावली. फेरीवाला क्षेत्र निश्चितीचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी सर्वसहमतीने पार पाडले. रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. शंभरफुटी रस्त्यावरील अनेक वर्षांची अतिक्रमणे काढली. तेरा वर्षे रखडलेल्या सांगली, मिरज ड्रेनेज योजनेला गती देण्याचे काम केले. पायाभूत सुविधांबरोबरच उत्पन्नवाढीकडे विशेष लक्ष दिले. मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेऊन उच्चांकी कर वसुली केली.
नव्या आयुक्त संजीता मोहपात्रा या मूळच्या ओडिशा राज्यातील आहेत. सुंदरगड जिल्ह्यामधील राऊरकेला हे त्यांचे गाव. अभियांत्रिकी पदवीनंतर त्यांनी राऊरकेला येथे स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पाच वर्षे असिस्टंट मॅनेजर, तसेच मॅनेजर म्हणून काम पाहिले. त्या 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामाचा चांगला ठसा उमटवला.