सांगली : खासदार संजय राऊत यांना काड्या टाकायची सवयच आहे. तीन वर्षापासून ते महायुतीत काडी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्याकडील सर्व अणुबॉम्ब संपले आहेत. माध्यमेच त्यांना खूप महत्त्व देतात. आम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने बघत नाही, असा टोला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा येथे झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केल्याबद्दल विचारले असता देसाई म्हणाले, हिंदीभाषिक भागात गेल्यानंतर त्यांच्या बोलीभाषेत बोलावे लागते. त्यामुळे मराठी भाषेबद्दल वेगळे बोलण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. खासदार राऊत यांना काड्या टाकायची सवयच आहे. महायुतीत काडी टाकण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. परंतु आजअखेर महायुतीमध्ये ते आग लावू शकले नाहीत.
मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याबाबत ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्यासंबंधात दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे भाष्य होत नाही, तोपर्यंत यावर बोलणे योग्य नाही. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली आहे. त्यापूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट झाली आहे. त्यामुळे अधिकृत कोणी जाहीर करत नाही, तोपर्यंत सांगता येणार नाही.
देसाई म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत 70 टक्केपेक्षा जास्त नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. आम्ही बोलतो कमी आणि काम जास्त करून दाखवतो. विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढवल्या, त्यापैकी 61 जागा निवडून आणल्या. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. परंतु महाराष्ट्रातील जनतेनेच मतदान करून शिवसेना खरी कोणाची? यावर विधानसभेच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब केले आहे.
अवकाळी नुकसानभरपाईबाबत कृषिमंत्री यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे. मंगळवारी होणार्या बैठकीत मदतीबाबत निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारचे मदतीबाबत जे निकष आहेत, त्याप्रमाणे राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाईल. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. फरारी आरोपीलाही नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे, हरिदास लेंगरे उपस्थित होते.
शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीत मंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षसंघटन मजबूत करा. जास्तीत जास्त सक्रिय सदस्य नोंदणी करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागा.