सांगली : विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला 2016 मध्येच मंजुरी मिळालेली आहे. याबाबत आमदार रोहित पाटील खोटे बोलत आहेत. ते जास्त सोंगे करत आहेत. रोहित, तू कुठे, किती वाजता एका स्टेजवर यायचे ते सांग, तिथे मी सर्व कागदपत्रे घेऊन येतो. सत्य समोर आणून उघडे पाडतो, असे आव्हान माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
या महामार्गाची तुमची, 2016 ची मंजुरी ही नुसती कागदावरच होती, असे आमदार रोहित पाटील यांनी म्हटले होते. सध्याचा महामार्ग प्रकल्प हा पूर्णपणे नव्या अलाईनमेंटसह, नव्या रस्त्यासह, नव्या निविदेसह, नव्या निधीसह, नव्या संकल्पनेतून साकारला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्याचा माजी खासदार पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ते म्हणाले, विटा- तासगाव ते काकडवाडी फाटा पंढरपूर रोडपर्यंतचा चारपदरी रस्ता मंजूर करून घेतला. त्याला 2016 मध्येच मंजुरी मिळालेली आहे. आमदार रोहित पाटील खोटे बोलत आहेत.