सांगली : निष्ठावंत कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला जीव लावणारे नेते यांचे नाते कसे असावे, याचा आदर्श तासगाव तालुक्यात पाहायला मिळाला. चार दिवसांपूर्वी माजी खासदार संजय पाटील यांनी तासगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात निमणी (ता. तासगाव) येथील श्याम ऊर्फ अथर्व राजमाने आपल्या एकुलत्या एका बैलासह, स्वतःला औताला जुंपून 5 किलोमीटर धावला. याची माहिती मिळताच संजय पाटील भारावून गेले. त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत वसुबारसच्या पूर्वसंध्येला युवा नेते प्रभाकर पाटील यांच्यामार्फत श्याम यांच्या दारात नवा बैल उभा करत दिवाळीची भेट दिली.
निमणी येथील श्याम राजमाने हा संजय पाटील यांचा तिसऱ्या पिढीतील कार्यकर्ता.. चार दिवसांपूर्वी माजी खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि तासगावात चक्का जाम आंदोलन पुकारले. शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना आंदोलनात सामील होण्याची हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत निमणीच्या श्यामने बैलगाडी घेऊन आंदोलनस्थळी जाण्याचे ठरवले. पण दावणीला एकच बैल... पण त्याने पर्वा केली नाही. ऑक्टोबर हीटची पर्वा न करता स्वतःला बैलाशेजारी औताला जुंपून भर उन्हात तब्बल 5 किलोमीटर चालत तासगावच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांचा औतासोबत अनवाणी चालतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.
याची माहिती माजी खासदार संजय पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांना मिळाली. श्यामचा निःस्वार्थ त्याग आणि संघर्ष पाहून वसुबारसच्या पूर्वसंध्येला प्रभाकर पाटील स्वतः श्यामच्या दारात दुसरा बैल घेऊन उभे राहिले. नेत्याने कार्यकर्त्यावर दाखवलेले प्रेम पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.