सांगली : भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) निवडीसाठी मंगळवारी 42 सदस्यांनी मतदान केले. प्रत्येक मतदाराने इच्छुक तीन उमेदवारांची नावे प्राधान्यक्रमाने लिहिलेले बंद पाकीट पक्ष निरीक्षकांकडे दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस आहे. पक्ष निरीक्षकांचा अहवाल प्रदेश भाजपला जाईल. दि. 3 अथवा 4 मे रोजी ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष निवड जाहीर होईल.
शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील एका हॉटेलवर भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) या पदासाठी मतदान झाले. माजी पालकमंत्री आमदार सुभाष देशमुख व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी अध्यक्ष राजाराम गरूड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह एकूण 42 जणांनी मतदान केले. आजी, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष, यांचे जिल्हाध्यक्षपदासाठी मतदान होते. माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हेही यावेळी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदासाठी संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख, शिवाजी डोंगरे तसेच मिलिंद कोरे (कवठेमहांकाळ), विलास काळेबाग (आटपाडी), राजाराम गरूड (कडेगाव) हे 6 इच्छुक उमेदवार आहेत. संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. लोकसभा निवडणुकीपासून देशमुख बंधूंमध्ये अंतर पडले. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ते आमने-सामने आले आहेत. बंद पाकिटातील मतदानाचा अहवाल प्रदेश भाजपला जाणार आहे. दि. 3 अथवा 4 मेरोजी अध्यक्ष निवड जाहीर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील उमेदवार जिल्हाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसेल, असे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष (शहर) पदासाठी रविवारी मतदान झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर पक्ष निरीक्षक होते. जिल्हाध्यक्ष शहर पदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रकाश ढंग, अॅड. स्वाती शिंदे, पृथ्वीराज पवार यांचे नाव चर्चेत आहे. ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्ष निवड दि. 3 अथवा 4 मेरोजी जाहीर होईल.
प्रदेश भाजपने यावेळी राज्यातील काही जिल्ह्यांच्या अध्यक्षपदी महिला अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुकांनाही संधी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदासाठी 6 इच्छुकांव्यतिरिक्त महिला व अनुसूचित जातीच्या उमेदवाराचे नावही बंद पाकिटात लिहावे, असे पक्ष निरीक्षकांनी सांगितले. महिलांमधून अनिता धस (ता. शिराळा) आणि स्नेहलता जाधव (जत), तर अनुसूचित जाती प्रवर्गातून अनिल लोंढे (कवठेमहांकाळ) हे इच्छुक म्हणून पुढे आले.