सांगली; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून प्रतीक भीमराव गायकवाड (वय 21, रा. हारुगडे प्लॉट, सांगलीवाडी) या तरुणाचा लोखंडी पाईपने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या खुनाचा अवघ्या 12 तासांत छडा लावत एकास अटक केली आहे.
किशोर नामदेवराव कदम (43, हारुगडे प्लॉट, सांगलीवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला गुरुवार, 4 एप्रिल रोजी न्यायालयात उभे केले जाणार आहे. प्रतीक व संशयित किशोर एकाच गल्लीतले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. मंगळवारी रात्री प्रतीक जेवण करून घरी बोलत बसला होता. किशोरने त्याला घरातून बोलावून घेतले. पूर्वी झालेला वाद उकरून काढला. दोघांत कडाक्याचे भांडण सुरू झाले. यातून किशोरने तिथेच पडलेली लोखंडी पाईप घेऊन प्रतीकच्या डोक्यात हल्ला केला. प्रतीक आरडाओरड करू लागल्यानंतर त्याचे वडील भीमराव आले. ते भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी किशोरने त्यांच्या डोक्यातही पाईपने हल्ला केला. प्रतीक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर किशोर पसार झाला होता. तो कृष्णा नदीकाठी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे, हवालदार गौतम कांबळेश संतोष गळवे व संदीप कुंभार यांच्या पथकाने बुधवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, जखमी भीमराव गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नी प्रमीला (50) यांनी फिर्याद दिली.