सांगली : सांगलीवाडी येथील फल्ले कार्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी जीपमधून तस्करी केला जाणारा 24 लाख 90 हजार 440 रुपयांची सुगंधी तंबाखू, पानमसाला असा माल अन्न व औषध विभागाने पकडला. याप्रकरणी विश्वास भारत शिंदे (वय 25, सध्या रा. अशोका हॉटेलमागे मिरज एमआयडीसी, मूळ रा. बेवनूर, ता. जत) याला अटक केली आहे. तसेच संशयित उत्पादक आनंदकुमार परशुराम बालदी, जितेंद्र कुमार प्रजापती, पुरवठादार उमेश पाटील (रा. कुडची), अतुल कश्यप (रा. हुबळी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सायंकाळी अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलेगर यांना सुगंधी तंबाखू, पानमसाला याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयाजवळ पिकअप् जीप (एमएच 10 सीआर 6460) थांबवली. तत्काळ अन्न-औषधचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालक विश्वास शिंदे याला ताब्यात घेतले. गाडीतील बॉक्स व पोत्यामध्ये काय आहे? अशी विचारणा केली. तेव्हा त्यामध्ये पानमसाला व सुगंधी तंबाखू असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे कारवाईसाठी पिकअप् गाडी सांगली शहर पोलिस ठाण्यात आणली. तेव्हा 41 मोठी पोती, 21 मोठे बॉक्स भरून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 24 लाख 90 हजार 440 रुपयांचा सुगंधी तंबाखू, पानमसाला यांचा साठा आढळून आला.
हा मुद्देमाल आणि पिकअप् गाडी मिळून 30 लाख 90 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक विश्वास शिंदे याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.