सांगली ःकर्नाटक येथील मायाक्का चिंचली यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे मतदान तीन दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. अंतिम निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान दि. 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र या दिवशी चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेस सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात. यात्रेनंतर गावाकडे परततात. यात्रेचा मुख्य विधी 5 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर असणार आहेत. त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. भाविक दोन दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात, त्यामुळे मतदान किमान दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, जतचेआमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोगाकडे केली आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. तीन दिवस उशिरा म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याबाबत विचारणा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांकडून रविवार, दि. 18 पर्यंत अहवाल मागविला होता. हे अहवाल आयोगाला पाठविण्यात आले आहेत. आता आयोग मतदानाची तारीख बदलणार का? याकडे लक्ष आहे.
पूर्ववेळापत्रकानुसार दि. 5 फेब्रुवारी रोजी गुरुवारी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी शनिवारी मतमोजणी होती. नव्या निर्णयानुसार जिल्ह्यात रविवार दि. 8 फेब्रुवारी रोजी, मतदान घेतल्यास मतमोजणीही पुढे ढकलावी लागणार आहे. सांगलीची मतमोजणी पुढे ढकलल्यास अन्य जिल्ह्यांत मतदान नियमित वेळापत्रकानुसार म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी होऊनही मतमोजणी सांगलीसोबतच एकत्र करावी लागण्याची शक्यता आहे.