सांगली ः चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची सध्या लगबग वाढली आहे. पुढील काही दिवसांत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतींची निवड होणार आहे. त्यामुळे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी 6 स्वीय सहायक, 6 वाहनचालक आणि 12 शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत.
22 मार्च 2022 पासून पदाधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत चालविला जात आहे. मात्र आता लोकप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार असल्याने निर्णय प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यालयीन व्यवस्था, दालनांची सजावट, कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि वाहन सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालनांची साफसफाई, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. फर्निचर, संगणक, इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच इतर तांत्रिक सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत. प्रत्येक सभापती व अध्यक्षांसाठी आवश्यक असलेले कर्मचारी वर्ग तैनात करण्यात येत आहेत. कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी वाहन चालक आणि स्वीय सहायक (पीए) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकृत वाहनांसह चालकांची नेमणूक पूर्ण करण्यात आली आहे. बैठकींसाठी ध्वनिव्यवस्था, प्रोजेक्टर आणि नोंदणी प्रणाली सज्ज ठेवण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरळीत आणि प्रभावी व्हावा, हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधी सक्रिय होत असल्याने जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि कर्मचारी व्यक्त करत आहेत. प्रलंबित योजना, निधी वितरण आणि स्थानिक प्रश्नांवर आता थेट निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.