सांगली ः जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत महायुती आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापती पदाबाबत खलबते सुरू आहेत. सत्तास्थापनेत आपल्याला काय हवे, याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आज-गुरुवार, 12 रोजी मिरजेत बैठक होणार आहे. बैठकीमध्ये फॉर्म्युला तयार करून तो प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेसकडूनही सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून नेतेमंडळींच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. हॉटेल, विश्रामगृह आणि खासगी ठिकाणी गुप्त बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांचा ओढा महाविकास आघाडीकडे, तर काहींचा भाजपकडे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुती अथवा इतर कोणत्या पक्षासोबत जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक मिरजेत होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेबाबत कोणासोबत जावे, सत्तेत आपल्या वाट्याला काय हवे, याबाबत फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे. तो फॉर्म्युला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा होणार आहे
जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत, त्यापाठोपाठ भाजप 16, काँग्रेस 11, शिवेसना 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 6 जागा मिळाल्या, तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्यला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला आहे.दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील गुरुवारी जिल्ह्यात येणार आहेत. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेसमधील नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पाठिंब्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये कोणासोबत जावे, याबाबत काही मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, भाजपकडून सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महायुतीच्या घटक पक्षांशी संवाद साधत आहेत. अध्यक्ष महायुतीचा होईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. सत्तास्थापनेत शिंदे-शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपमधील काही नेते आग्रही असल्याचे बोलले जात आहे. मात्र आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील राजकारणामुळे पाठिंब्याबाबत शिवसेनेतील नेते राजी नसल्याचे चर्चा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरही चर्चा सुरू आहेत.